द लास्ट एपिसोड (भयकथा)

© सागर कुलकर्णी

जुलै महिन्यातली ती रात्र, एका काळरात्री पेक्षा निश्चितच कमी नव्हती. सलग तीन दिवस चालू असलेल्या मुसळधार पावसाने त्या रात्रीला खूपच गडद आणि भयानक केलं होतं. त्या रात्री दोन विजा पडल्या होत्या, एक मुसळधार पावसामध्ये ढगांवर ढग आदळून पडते ती आणि दुसरी राजनच्या कुटुंबियांवर पडली होती ती. आज वर्ष झालं तरी राजनचे कुटुंब त्या धक्क्यातून सावरलं नव्हतं पण त्याच्या शिवाय जगण्याची सवय त्यांना गेल्या काही वर्षांत नक्कीच झालेली होती.
पैशासाठी त्याच्या बहिणीला सासरच्यांनी दिलेले चटके आणि जळून मेलेली ती, हे उघड्या डोळ्यांनी बघितल्यामुळे राजनच्या डोळ्यातले अश्रू आणि मनातली भीती ही तिच्याबरोबरच मेलीे होती. देव असतो या गोष्टीवरचा त्याचा विश्वास कधीच उडाला होता आणि म्हणूनच कि काय भुतांची जवळीक ही त्याला आपली वाटू लागली होतीे. त्याला भुतांच्या गोष्टी , भुतांची पुस्तकं याचा भयानक नाद लागला होता. सुरुवातीला या गोष्टीची वाटणारी भीती नंतर त्याला खूपच जवळची वाटू लागली. रात्री-अपरात्री वेताळ टेकडीवर तो आणि त्याचे काही मित्र भुतांना शोधत फिरायचे. त्याच्या मित्रांसाठी हे एक थ्रिलर होतं तर त्याच्यासाठी छंद.त्याच्या या छंदाने आणि नंतर झालेल्या सवयीने त्याच्या घरचे पूर्णपणे घाबरून गेले होते, त्यांनी डॉक्टरांपासून ते तांत्रिका पर्यंत सगळे प्रयोग केले पण राजनची ही नशा ते उतरवू शकले नाहीत. काही डॉक्टरांनी राजन हा डोक्याची नस फाटुन मरेल अशीही भीती वर्तवली होती.
नोकरीनिमित्त बाहेर पडल्यावर त्याचं हे वेड आणखीनच तीव्र झालं. त्यांनं घरही एका टोकाला अगदी स्मशानाच्या जवळ घेतलं होतं. तीन वर्षापूर्वी सुरू झालेल्या हॉरर शो मुळे तो अधिकच खूष झाला होता, शुक्रवारची रात्र ही त्याच्यासाठी एक भयानक असुरी आनंदाची रात्र असायची. हॉरर शो बघताना तो त्याच्यामध्ये स्वतःला विसरून जायचा ते भेसूर हसणं, अंगावर येणारं ते भयानक संगीत, ते अंधारातले सीन , पडणारे मुडदे , हिडीसपणे फिरणारी भूतं ही त्याला त्याच्या घरच्यांपेक्षा खूप जवळ वाटायची. मग तो अपरात्री एखाद्या भुतासारखा बाहेर पडायचा, स्मशानातल्या वडाखाली तासनतास बसून राहायचा. यामुळे नोकरी न टिकणं हे काही अशक्य नव्हतं.
एक-दोन वेळा त्या वडाखालून त्याला बेशुद्धावस्थेत काही लोकांनी हॉस्पिटलमध्येही नेलं होतं त्याची मात्र एकच डिमांड असायची.... त्याच्या रूममध्ये हॉरर शो तेवढा दिसला पाहिजे. झोपेची आबाळ, दिवस-रात्र भुताखेतांचे विचार याच्यामुळे तो एकदमच हडकला होता. तो तासनतास सलग हॉरर शो चे एपिसोड बघायचा आणि स्वतःशीच हसायचा, कधी भिंतीकडे तर कधी छताकडे बघून जोरात हसायचा. पुढेपुढे तर त्याची विकृती एवढी वाढली की अमावस्या-पौर्णिमेला उतरून टाकलेले दहीभात-लिंबू तो घरी आणून खात बसायचा. एखाद्या सामान्य माणसाला क्षणार्धात हृदय घात करून मारेल अशी त्याची जीवनशैली झाली होती. घरच्यांनी त्याला कधीच सोडलं होतं आणि त्याच्या या घरी कुणी येतही नव्हतं आणि तोही कोणाच्या घरी कधी जात नव्हता .....एकटे राहण्याचा असुरी आनंद त्याला वाटायचा..... स्मशान शांतता ही त्याला अधिक प्रिय होती.
पुढे पुढे तर त्याला दिवसाआड सलाईन मधूनच जेवण द्यावं लागत होतं, त्याच्या मनाचा कण न कण या विक्षिप्त गोष्टीना साठलेला होता. थोडीशी शुद्ध आली की पुन्हा तो आदळ आपट करायचा, वेड्यासारखे चाळे करायचा , हॉरर शो बघण्याचा हट्ट करायचा आणि मग डॉक्टर त्याला झोपेचे इंजेक्शन देऊन झोपवायचे. बहुतेक त्याच्या शेवटाला सुरुवात झाली होती.
अखेर तो दिवस आलाच, डिस्चार्ज मिळाल्यावर तो घरी आला ...... वडा भोवती फेरी मारून तिथं पडलेला दहीभात त्यांनं उचलला आणि तडक घरी गेला. मेणबत्तीच्या प्रकाशात जेवायची त्याला सवय लागली होती. आज पुन्हा स्वतःला मेणबत्तीच्या वर्तुळात बसवून, समोर हॉरर शो चा एपिसोड लावून तो जेवायला बसला. अचानक एका एपिसोड मध्ये आई आणि मुलाचे प्रेम बघून त्याला त्याच्या आईची आठवण आली, बऱ्याच वर्षानंतर त्याच्या ओसाड पडलेल्या डोळ्यांमध्ये पाणी तरळलं होतं. ओठांपर्यंत ओघळणाऱ्या त्या अश्रुंबरोबर त्यानं भाताच्या मुठी करून खायला सुरुवात केली. आईची आठवण त्याला शांत बसू देईना .......मग तो हॉरर शो चा आवाज वाढवतच गेला .....वाढवतच गेला.... वाढवतच गेला आणि एकदम पेटत्या मेणबत्त्यांवर कोसळला. मेणबत्तीच्या ज्योतींनी त्याला पूर्ण वेढलं....... आता त्यांनी ज्वालांचं रूप घेतलं होतं .......तोंडातून शब्द फुटणं शक्यच नव्हतं कारण ज्यावेळी तो कोसळला त्याच वेळी त्याचा प्राण निघून गेला होता.
फायर ब्रिगेडनं आग विझवली.... घर अर्ध जळालं होतं ...घरातल्या भिंतींवर आजही हॉरर शो च्या आवडत्या एपिसोड्स ची नावे रक्तानं लिहिल्यासारखी भासत होती..... घराबाहेरच्या बिन मध्ये दही भाताच्या पत्रावळ्या साठल्या होत्या ......बेसिन मध्ये सडलेली लिंब पडलेली होती. फायर ब्रिगेडच्या लोकांना उलटी होणे सहाजिकच होतं.
आजही, ते घर बंदच आहे ......त्याच्या भिंतींवर हॉरर शो चे एपिसोड तसेच आहेत ......एक भेसुर, भयान शांतता अर्ध्या जळलेल्या खिडकीतून तिथे डोकावते...... असं म्हणतात की पोर्णिमा-अमावस्येला त्या वडा खालून आजही उतरवून टाकलेल्या पत्रावळ्या नाहीशा होतात आणि या घरातून हॉरर शो च्या संगीताचे मोठमोठ्याने आवाज येतात.

Comments