द लास्ट एपिसोड (भयकथा)

जाॅबलेस जाॅबसिकर (भयकथा)


 © सागर कुलकर्णी

गेली सहा महिने अनेक कंपन्यांच्या पायऱ्या झिजवल्या नंतर, त्यानं ठरवलं की एखादी प्लेसमेंट कन्सल्टन्सी गाठावी. " आयुष्याची वणवण एका क्षणात थांबवा, आपले अंतिम उद्दिष्ट गाठा ....फक्त एकदाच येऊन भेटा" ही जाहिरात वाचली... खाली कोणताही कॉन्टॅक्ट नव्हता आणि दिलेला पत्ताही एकदम शहराबाहेरचा. शेवटी काये की गरजवंताला अक्कल नसते तशी त्यालाही नव्हती. त्यानं जायचं ठरवलं, गुगल महाराजांकडून थोडी माहिती काढली.... बसचा शेवटचा स्टॉप सोडला की साधारण दीड किलोमीटर चालत जायचं. तिथं जीपीएसचा फार काही उपयोग होईल असं वाटत नव्हतं कारण गुगलमध्ये बस स्टॉपच्या पुढं वस्ती दिसत नव्हती.

सॅक खांद्याला लटकवली अन् घरातून बाहेर पडला. १३ नंबरची ती बस 'कैलास' स्मशानभूमीच्या पुढे येऊन थांबली तेव्हा .....एक्झॅक्टली दुपारचे बारा वाजले होते. टळटळीत ऊन आणि नेमकं पाणी बरोबर घ्यायचं विसरला होता. बस मध्ये एकटाच उरला होता, खाली उतरून हो-नाही, हो-नाही करत कित्येक वर्षांपूर्वी लोकांनी मोर्चा काढून बंद पाडलेल्या 'कैलास'च्या त्या एकाकी भूमीवर त्यानं पाय ठेवला. ठिबकत असलेल्या जुनाट अश्या गंजलेल्या नळाचं पाणी पिलं आणि पुन्हा शोधलेल्या मार्गानं पायपीट सुरु केली. एखाद किलोमीटर गेल्यावर झाडाखाली बसून बरोबर आणलेली बिस्किटं खाल्ली आणि पुढे निघाला. 'कैलास' आता मागे पडलं होतं पण त्याच्या दक्षिणेकडच्या भागातून धूर दिसत होता. मनानं हलकीशी साद घातली, " अरे बाबा १३ नंबरची बस, स्मशानाचा स्टॉप, दूर दूर पर्यंत पाखरांचीही चाहूल नाही, फ्रेश काहीतरी जळत असल्यासारखं वाटतंय..... आपण बरोबर ठिकाणी चाललोय ना?". मनाला दामटत नोकरीच्या विवशतेनं पुढे निघाला. प्लॉटचा नंबर १३, उदास, खिन्न असं बसकं घर, थोडं ऐसपैस, पण आजूबाजूचं गवत वाळून अगदी पिवळंजर्द झालेलं. त्याच्यावरून चालताना त्याच्याच पायाचा चर्र चर्र आवाज त्यालाच अस्वस्थ करत होता, प्रथमदर्शनी त्या घराची नुकतीच डागडुजीही चालू आहे असंही वाटत होतं.
दाराच्या बाहेर पडवीत मस्त अशा विटकरी लाल रंगाच्या, ओंजळीच्या आकाराच्या बारा कुंड्या लटकलेल्या होत्या, पण त्या कुंड्यांमध्ये काहीच उगवलेलं नव्हतं. आत जायच्या आधी, थोडं कुतूहल म्हणून घराच्या आजूबाजूला बघावं म्हणून पुढे गेला, घराच्या एका दिशेला कौलांच्या खाली गोल पण वेगवेगळ्या आकारांची मडक्यांसारखी भांडी लावलेली होती... एकमेकांना नळ्यांनी जोडल्या सारखी दिसत होती. एकूण बारा आसतील... कौलावर साठलेलं पाणी त्यातून ओघळीसारखं जात असावं बहुतेक. घराभोवतीच्या कुंपणालाही एक सारखे पातळ अशे खांब उभे केलेले होते ....साधारण ते चोवीस असावेत.
दारावर टकटक केलं ....कोणी उघडलंच नाही. हळूच ढकललं तर ते उघडंच होतं. त्या मोठ्या दिवाणखान्यात, मधोमध टेबलावर काही फाईल्स होत्या, प्रत्येक फाईल मध्ये तशाच जाहिरातीचं कात्रण होतं. त्या चाळता चाळता सहज लक्षात येत होतं की त्या याआधीच्या जाॅबसिकर्सच्या असाव्यात. बायोडेटा, त्यांची सर्टिफिकेट्स, वगैरे वगैरे, समोरच भिंतीवर एक शोकेस वजा बोर्ड दिसत होता, ज्यामध्ये या उमेदवारांचे फोटोही लावलेले होते. एकेक न्याहाळत त्यानं अंदाज बांधला की 'हे सगळे इथे येऊन त्यांच्या त्यांच्या आयुष्यात यशस्वी झालेले दिसतात, एवढ्या लांब येऊन सार्थक झालं म्हणायला हरकत नाही'.
थोडं थांबून त्यानं पुन्हा आवाज दिला "कोणी आहे का? जाहिरात वाचून आलोय".... काहीच प्रतिसाद नाही. तेवढ्यात मनानं पुन्हा साद दिली, "अरे, एवढ्या सुनसान जागेत भलेही दुपारची वेळ असो ....पण कुणी काही केलं तर? चल परत जाऊ". दुसरं मन म्हणालं, "काय नाही होत रे, हे बघ हे सक्सेसफुल कॅंडिडेट्सचे फोटो ...एक... दोन... तीन...बारा. हेही १२.... मग मात्र अस्वस्थ झाला, भराभर फाइल्स चाळल्या ....त्याही बारा .....आता मात्र साफ हादरला. लक्षात यायला लागलं .....ओंजळी सारख्या १२ कुंड्या.....त्याला लटकवलेले विचित्र दांडे... कुंपणावरचे ते २४ खांब .... कौलांच्या खालची बारा मडकी..... बापरे. चटकन अंगावर शहारा येऊन गेला...... हात पाय थरथर कापू लागले.
त्या शोकेस मधला एक-एक फोटो बघून, कौलाखाली लावलेल्या एकेका मडक्याचा त्याला अंदाज येऊ लागला. एक तर अगदी कालच बसवल्यासारखं वाटत होतं ....पण त्याच्या नजरेनं दुर्लक्ष केलं होतं. आता मात्र छातीची धडधड खूपच वाढली होती, घामानं ओलाचिंब झाला होता. तेवढ्यात शोकेसच्या काचेतून त्याला दिसलं कि एक चमकणारी, धारदार वस्तू त्याच्या मानेकडे आली आणि पुढच्याच क्षणी तो कोसळला.
स्वतःच्या रक्ताच्या थारोळ्यात असताना त्याच्यासमोर जाहिरातीचा पेपर पडला होता आणि अंधुक होत जाणाऱ्या डोळ्यांसमोर ती अक्षरं पुन्हा नाचत होती.......

" आयुष्याची वणवण..... एका क्षणात थांबवा..... आपले अंतिम उद्दिष्ट गाठा ....फक्त एकदाच येऊन भेटा".

दुसऱ्या दिवशी 'कैलास'च्या मागच्या बाजूला पुन्हा काहीतरी जळत होतं आणि आणखी एक जाॅबसिकर त्याच्याकडे दुर्लक्ष करत प्लॉट नंबर १३ कडे चालत चालला होता.............

Comments