द लास्ट एपिसोड (भयकथा)

दळण (लघुकथा)

© सागर कुलकर्णी

दसऱ्याचा दिवस आला की म्हादबाच्या गिरणीला नवं रूप यायचं, पांढर्या फटक पडलेल्या भिंतींना अंघोळ मिळायची, दळणाचे डबे ठेवायच्या फलाटाचं अंग पुसलं जायचं. लोकांचे दळणाचे डबे तो एरवीही पुसूनच द्यायचा पण ते खांद्यावरचं फडकं मात्र यावेळेस बदललेलं असायचं. एकच खिडकी आणि ती ही कायम बंद असायची, तिच्यातून त्यादिवशी भरपूर उजेड आत खेळायचा. त्याची बायको सकाळीच येऊन गिरणी पुढं सडा- रांगोळी घालून जायची. गहू , ज्वारी, बाजरी , भाजणीच्या पिठाच्या वासात त्यादिवशी झेंडूच्या फुलांचा, केवड्याच्या अगरबत्तीचा वास मिळुन एक नवीन वास तयार व्हायचा . रोज लोकांना पीठं देणारा म्हादबा त्या दिवशी मात्र सोनं वाटायचा. तसं तर त्याच्या गिरणीतून आलेल्या पिठाच्या भाकरीचा तुकडा, सोन्याच्या घासापेक्षा कधीच कमी नव्हता. एक कोपरी, पायजमा अन नॅपकीनवर असणारा म्हादबा दसऱ्याला मात्र नवीन कपडे घालून गिरणीचा दारात उभा रहायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्यांशी अगदी मनमोकळेपणानं बोलायचा, हसत खेळत विनोद करायचा.

माझी आठवड्यातून एकदा तरी म्हादबाच्या गिरणीवर चक्कर व्हायची, माझ्या दळणाचा नंबर येईपर्यंत त्याच्याशी चार गोष्टी व्हायच्या. गिरणीचा पट्टा कमी झाला की मग त्याच्या तोंडाचा पट्टा सुरू व्हायचा, इकडच्या तिकडच्या गोष्टी तो सांगायचा. त्याची बोलीभाषा गावाकडची असल्यानं, 'बेनं', 'लई', 'कवाबी' हे शब्द यायचे आणि माझ्या शाकाहारी मनावर उगाचच मांसाहार केल्याचा भाव यायचा. तो न चुकता घरच्यांची चौकशी करायचा, तेंव्हा तो मला खूपच जवळचा वाटायचा. माझ्यासाठी त्याच्या गिरणीत जेमतेम अर्धा तास उभं राहायचं म्हणजे तोंडावर रुमाल ठेवावा लागायचा आणि तो मात्र दुकानाची फळी उघडल्यापासून ते बंद करेपर्यंत एका मळकट नॅपकीनच्या जोरावर दिवस काढायचा. एकदा त्याच्या जेवणाच्या वेळेला मी पोहोचलो तर अवघी एक भाकरी खाऊन तो उठला, मी म्हणालो "काही घाई नाहीये, होऊ द्या जेवण". तर हसून म्हणाला "दिवसभर अर्धा-एक किलो पीठ पोटात जातं, पाणी ढोसलं कि होतीया कनीक पोटात, मग अजून कसलं जेवण", मला मात्र त्याची कीव यायची.

कट्ट्यावर कधीकधी त्याची कच्चीबच्ची येऊन खेळायची, गव्हावर गहू टाकून मग तो त्यांच्यासोबत थोडा वेळ काढायचा. त्यांच्या अंगावर पिठाच्या रेघोट्या नको म्हणून, त्यांना हात न लावता त्यांच्याशी खेळायचा. त्याची बच्ची त्याला बिलगायची आणि तो गिरणीच्या आवाजाचा वेग मंदावला की हळूच त्यांना ढकलून पुन्हा त्या पांढऱ्या जगात घुसायचा. बायकोनं काही मागितलं तर मुद्दाम पट्ट्याचा वेग वाढवून वेळ ढकलून न्यायचा. पीठाची चोरी हा प्रकार त्यानं कधीच केला नव्हता, इमान-इतबारे आपला उद्योग करून पोट भरण्याच्या त्याच्या विचाराला त्यानं कधीच फाटा दिला नाही. मला नेहमी म्हणायचा," दादा, परसंग किती बी बाका आला तरीबी मागं नाय हटायचं, रेटून धरायचं. येळ निघून जातीया, आपलं कायबी बिघडवू शकत नाही जर आपण ठरवलं तर", याच विचारावर पोरीचं टायफाईडचं दुखणं त्यानं पळवुन लावलं होतं पण दिवस-रात्र काबाडकष्ट करून जमवलेले ४-५ हजार एका क्षणात भुरर झाले, तरी म्हादबा हटला नाही. त्याचे विचार मला नेहमी काहीतरी नवीन शिकवायचे, एक वेगळी दिशा द्यायचे.

गावात आठवड्यातनं दोन तीन वेळा लाईट जाणं काही नवीन नव्हतं, एकदा अशीच लाईट गेली तेव्हा मी आणि तो त्याच्या कट्ट्यावर गप्पा मारत बसलो होतो. त्याची बायको लक्ष्मी, त्याच्यासारखीच कष्टाळू, घासातला घास त्याला देणारी. तिला बघुन तो सुखावून जायचा, म्हणायचा "नशीबवान हाय मी म्हणून ही भेटली, बापानं कर्जासकट गिरण ताब्यात दिली अन् गेला हे जग सोडून, आय तर कवाच गेली होती. आता आम्ही दोघंच, एकमेकांचं मायबाप". क्षणभर शांत झाला तेवढ्यात पोरीनं 'बाबा' म्हणून हाक मारली तसा तो भानावर आला, म्हणाला, "पै पै करून जमवलेला पैका डाक्टरच्या घशात घातला, तेवढचं थोडं कर्ज फिटलं असतं. पाट्यावर आणि चक्कीत अडकलेल्या पिठावर भाकरी निघतीया पर गिरण कशी सोडवायची हे काय सुचत नाय. आता पतुर दोन येळा बँक्येची लोक येऊन गेली, पुन्ह्यांदा आली तर टाळं लावू म्हणाली. त्यांची तरी काय चूक, मोठी धेंडं कर्ज चुकिवत्यात आणि आमच्यासारखे अडाणी दगड पिसले जात्यात". जीवनाची अगतिकता आणि सर्वसामान्यांचं तत्त्वज्ञान त्याच्या बोलण्यातून जाणवायचं. आमच्यात दोन तीन वर्षाचं अंतर होतं पण तरी तो मला दादा म्हणायचा, का तर माझ्या नशिबावर मध्यमवर्गाचा शिक्का होता तर त्याच्या कपाळी गरीबीचा डाग. उबग आली जीवनाची असंही म्हणायचा पण बायका-पोरांकडे बघून पुन्हा उभा रहायचा.

मात्र गेल्या शनिवारपासून गिरणी बंद होती, आज तीन दिवस झाले. आजूबाजूला विचारलं तर म्हणाले "काय माहित नाय, उजडायच्या आत म्हादबा अन् त्याचे घरचे कुठेतरी गेले", सोबत काही होतं का विचारलं तर "यक गाठोडं होतं बरोबर", एवढंच कळलं. माझ्या मनात असंख्य विचार आले, गेल्या कित्येक वर्षात त्याला कोणी नातेवाईक आहे असं तो बोलला नव्हता, कुठे गेला असेल कोण जाणे. गिरणी वर बँकेचा पिवळा कागद दिसला, तात्पुरत्या जप्तीची नोटिस होती. नाना विचार डोक्यात येऊ येऊ लागले, तेही नको ते, सुन्न होऊन कट्ट्यावर बसलो. तास-दोन तास गेल्यावर वाटलं 'नदीघाट', 'पोलीस स्टेशन'ला जाऊन चौकशी करावी पण मन होईना. आयुष्याच्या जात्यात म्हादबाच्या जगण्याचा पट्टा तर तुटला नसेल ना? या विचारानं धस्सं झालं.

काहीच न करता दोन-तीन दिवस ढकलले, गिरणी कडे जाण्याची इच्छा होत नव्हती, पण पाय वळलेच. फळी उघडी दिसली, आत साफसफाईचा आवाज येत होता. डोकावून बघितलं तर म्हादबा टाकी लावत होता. मला बघताच चटकन उठला, म्हणाला, "दादा, माफी करा. तुम्हाला न सांगता गेलो व्हतो, आल्यावर कळलं की तुम्ही चवकशी करित होता म्हणून. त्यात तुमचं घर बी माहीत नव्हतं म्हणून तिकडं बी न्हाय यता आलं". त्याला बघून मला हुश्शं झालं, माझा आनंद गगनात मावत नव्हता. म्हणाला "त्या रातीला आमच्यात लई वाजलं, पार हमरीतुमरी पतुर. शेवटी आमच्या घरदेवीला इचारलं 'गिरण इकु का?', तर म्हणाली 'आपलं पोट हाय त्यात, एक डोरलं अन् थोडं सोनं हाय, ते इका'. व्हय-नाय करत ठरवून टाकलं. पहाटलाच निघालो, सोनं इकलं अन् कुळदेवीला जाऊन आलो. तेवढचे चार दिवस आम्ही संग काढलेे". हसतच म्हणाला "आविष्याचं दळण दळता दळता, सुखाचा घास खायलाच विसरून गेलो व्हतो.

म्हादबाचं सीमोल्लंघन अन त्याचे सोन्यासारखे चार दिवस बघून, आज मला पुन्हा .....दसरा आल्यासारखं वाटलं.

Comments