द लास्ट एपिसोड (भयकथा)

नवस (लघुकथा)

( गोष्ट गणेशोत्सवात बेभान होऊन नाचणार्‍या हजारो स्ट्रगलर्स पैकी एकाची)

© सागर कुलकर्णी 

श्रीं'च्या दर्शनाची रांग बघून आज पुन्हा तो परत फिरला, गेले दोन दिवस तो आज नक्की दर्शन घेणार या उद्देशाने बाहेर पडत होता आणि गर्दीची ती रांग बघून लांबूनच दर्शन घेऊन आल्या पावली परत जात होता. डोक्यावर कर्जाचा डोंगर, नोकरीचे वांदे, लग्न अजून तरी एक स्वप्नच. गावाकडे आई-वडील पोराच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले , त्याच्या शिक्षणासाठी काढलेल्या कर्जाची परतफेडीची वेळ केंव्हाच उलटून गेलेली. तो आज येईल, उद्या येईल या वायद्यावर तेही दिवस ढकलत होते. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती नवसाला पावतो असं म्हणतात .... तसे बहुतेक सगळेच गणपती गणेशोत्सवात नवसाला पावतात ...असे बॅनर, जाहिराती त्यानं पाहिल्या होत्या. पण कदाचित नावातल्या श्रीमंत पणामुळे आणि आज ती त्याची गरज असल्यामुळे तो तिथे नवस बोलण्याचा विचार करत होता, कदाचित इतर गणपती पेक्षा हा लवकर पावेल ही भोळीभाबडी अपेक्षा. डोक्यावर आधीच शिक्षणाचं कर्ज असल्याने, नवीन कर्ज घेऊन धंदा टाकण्याचे धाडस होईना; जिंकण्याआधीच हारण्याची आणि सुखासमाधानाने जगण्या आधी मरण्याची भीती त्याला वाटू लागली होती. 

टेलिकम्युनिकेशनचा डिप्लोमा करून पुण्यात दोन-चार वर्षं काम करून पैसा कमवायचा आणि गावात मोबाईलचं दुकान आणि एक टॉवर टाकुन पुढचं आयुष्य काढायचं हा त्याचा विचार. पण डिप्लोमा करून तीन महिने झाले, नोकरीच काय पण साधी ॲड ही दृष्टीस पडली नव्हती, कुठलीच दिशा मिळेना म्हणून प्रचंड तणावात दिवस कटत होते. बऱ्याचदा लकडी पुलावरून चालताना ..ते खालचे पाणी त्याला बोलवतंय असा भास व्हायचा पण पुलाच्या पलीकडे आई-वडील उभे आहेत हेही चित्र डोळ्यापुढे यायचं. अशांत गणेशोत्सव आला आणि अमावस्येच्या त्या गर्द काळोखात अचानक एक कवडसा आल्यासारखे त्याला वाटलं, त्यानं ठरवलं की श्रीमंतांकडे गार्‍हाणं मांडायचं ...काहीतरी दिशा नक्कीच मिळेल. ठरवलं की, उद्या मात्र संध्याकाळी न जाता पहाटेच दर्शनाला जायचं. सकाळी लवकर उठून, आवरून स्वारी निघाली... आज कालच्या पेक्षा जास्त उत्साहात. मंदिरापुढे हजारोंचा समुदाय तसाच, काहीच चित्र बदललं नव्हतं. तास-दोन तास प्रयत्न करून पुन्हा लांबूनच दर्शन घेऊन परत फिरला पण संध्याकाळी पुन्हा प्रयत्न करायचा, या विचारानं. जाताना दोन रुपयांचा पेपर उचलला आणि पेपरमध्ये एका कोपऱ्यात 'टेलिकम्युनिकेशन डिप्लोमा होल्डर / इंजिनीअरिंग कॅज्युअल कामगार पाहिजे' अशी अॅड दिसली आणि आनंदाने नाचू लागला. एवढ्या दिवसांनी एक अॅड आणि तीही त्याला हवी तशी आणि इंटरव्यू आजच ४ वाजता. 

बरोबर ३:३० ला तिथं पोहोचला. ४-५ हंगामी कामगारांच्या जागेसाठी शंभर उमेदवार आले होते, त्यात निम्मे इंजिनियर. डोक्यात पुन्हा विचार चक्र सुरु झालं, आजची ही संधी हुकणार असं त्याला वाटू लागलं. रडवेल्या चेहऱ्याने एन्ट्री घेतली, इंटरव्यू बरा झाला पण चान्सेस अगदीच धुसर होते, तरी सुद्धा काहीतरी चमत्कार होईल असंही त्याला वाटत होतं, मन द्विधा स्थितीत होतं. सगळ्यांनाच बाहेर थांबायला सांगितलं होतं. निकाल लागला आणि पाच च्या तिथं सहाजण निवडले गेले, दुर्दैवानं त्यात तो नव्हता. चमत्कार वगैरे काही नसतं आणि जरी असेल तरी देव पावायला आपण काही एवढे पुण्यवान नाही याची प्रचिती त्याला आली आणि पाय एका निर्धारानं लकडी पुलाकडे वळले. 

अख्खा महाराष्ट्र एकीकडे उत्सव साजरा करत होता आणि हा लकडी पुलाच्या मध्ये उभा राहून त्या गढूळ पाण्याच्या डबक्यात उडी मारू की नको हा विचार करत होता, तेवढ्यात वाड्याच्या इथे ढोल ताशा सुरू झाला आणि त्या आवाजाने त्यांची तंद्री भंगली. कुठलाही निर्णय घ्यायच्याआधी, एकदा तरी आपली तक्रार श्रीमंतांकडे मांडावी असा पुन्हा विचार आला. जाताजाता बेभान होऊन त्या ढोल ताशा च्या गजरात तो नाचला, अगदी सगळ्या विवंचना बाजूला ठेवून... बेभानपणे. इतक्या दिवसात साठलेलं सगळं त्यांनं नाचून बाहेर काढलं. शंभर एक जण नाचत होते तिथं, पण याच्या नाचण्यामध्ये कुठलीच भावना नव्हती. दोन तास नाचून दमला आणि रस्त्याच्या कडेला टेकला. इंटरव्यूला घातलेला शर्ट ओलाचिंब झाला होता, घशाला कोरड पडली होती, नाचून धापही लागली होती. दुःखात बेधुंद नाचणारा बहुतेक तो एकच पठ्ठया तिथे होता. 

क्षणभर डोळे मिटले, तेवढ्यात खांद्यावर एक हात पडला. डोळे उघडून बघतो तर सत्तरीतले एक आजोबा त्याच्या समोर उभे होते, त्यांनी त्याला पाणी दिलं, 'वडापाव खाणार का' म्हणून विचारलं. 'हो' म्हणाला. आजोबांनी सायकलला लावलेल्या पिशवीतून वडा-पाव काढला, पेपरमध्ये गुंडाळून त्याच्या हातात ठेवला. ती सायकल चालवण्यापेक्षा त्यांच्या पिशव्यांचं ओझं उचलण्याच्याच जास्त कामाला येत होती. त्यानं पैसे दिले आणि ते पुढं वळले. या वयातही कष्ट करणाऱ्या आजोबांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात राहिला.

तेवढ्यात वडापाव खाता खाता, त्याचं लक्ष त्या चुरगळलेल्या पेपर वरच्या अॅड कडे गेलं, दुसरी अॅड 'हंगामी इंजिनिअर/ डिप्लोमा होल्डर पाहिजे', इंटरव्यू उद्याच. समोर श्रीमंतांच्या पुढे गर्दी तशीच, नवस क-यांची रांग अजूनही तेवढीच. तिथूनच हात जोडले, खाली वाकून माती कपाळाला लावली आणि घर गाठलं. शर्ट धुतला आणि उद्याची वाट पाहत झोपी गेला. हा इंटरव्यू पहिल्यापेक्षा जास्त चांगला झाला आणि पुढच्या अर्ध्या तासात हंगामी का होईना पण ऑफर लेटर घेऊन तो बाहेर पडला. नवस करायच्या आधीच त्याची मागणी पूर्ण झाली होती. 

संध्याकाळी पुन्हा श्रीमंतांच्या दर्शनाला निघाला, पेढे घेऊन. विशेष म्हणजे अजिबात गर्दी नव्हती, पेढे ठेवले, डोकं टेकलं आणि बाहेर आला. प्रदक्षिणा घालून दोन क्षण बसला, तेवढ्यात पुन्हा खांद्यावर हात पडला. तोच स्पर्श, ते आजोबा पुन्हा मागे उभे होते. त्यांच्याकडे पाहून त्याला भरून आलं, त्यांच्या हातात पेढा ठेवून पायाला हात लावून नमस्कार केला. 

ते एवढंच म्हणाले "जिथे तू जगण्याची लढाई हरला नाहीस, तिथेच तू जिंकलास. यश मिळवण्यासाठी कुठल्याही नवसाची नाही तर कष्टाची आणि धीराची गरज आहे, बाकी विघ्न हरायला 'तो' आहेच की बरोबर". 

पाठोपाठ मंदिरातल्या घंटेचा आवाज झाला, ढोल-ताशांनी पुन्हा ठेका धरला, आणि मग एकच गजर झाला ...... 

।। मंगल मूर्ती मोरया ।। गणपती बाप्पा मोरया ।। 

Comments