द लास्ट एपिसोड (भयकथा)

काळी-पांढरी चित्रे (लघुकथा)

© सागर कुलकर्णी

आज तिची मानसोपचार तज्ञांकडे चौथी व्हिजिट होती, गेल्या तीन वेळेला खूप बोलतं करायचा प्रयत्न करूनही ती काहीच बोलली नव्हती. ऐन तारुण्यात हा असा एकाकीपणा तिला तिच्यापासून दूर घेऊन जात होता. त्या तीन भेटीत तीनं फक्त चित्रं काढली, अथांग सागराचं चित्र, गर्दीचं चित्र, उंच इमारतींचं चित्र, निळ्याशार आकाशाचं चित्र. लहानपणापासूनच तिला चित्रकलेची खूप आवड, या ऐच्छिक विषयात ती एवढी रममाण व्हायची की तिला इतर गोष्टींचं भानच नसायचं. तिनं चितारलेलं इंद्रधनुष्य बघून कदाचित इंद्रालाही तिचा हेवा वाटावा, तिच्या चित्रातला नील कृष्ण कदाचित त्या निळ्या रंगात स्वतःला आणखीनच भाग्यवान मानत असेल. वय वाढत गेलं तसं कलेवरचं प्रेमही वाढत गेलं. पण गेल्या कित्येक वर्षात तिनं फक्त दोनच रंग वापरले होते - पांढरा आणि काळा. या तीन भेटीतली ही चित्रंही अशीच होती. त्या प्रत्येक चित्रावर अंधाराची, उदासीनतेची, काळोखाची आणि काहीतरी अकल्पित घडलेल्या भूतकाळाची गर्द छाप होती.

डॉक्टरांना आज अपेक्षा होती ती तिने काहीतरी बोलण्याची. ती आली आणि डॉक्टरांचा पुन्हा एकतर्फी संवाद सुरू झाला, ते प्रश्नावर प्रश्न विचारत होते आणि ती कागदावर रेघोट्या मारत काळ्या-पांढर्या रंगाच्या विश्वामध्ये गढून गेली होती. मधेच ती हसायची, कधी भाऊक व्हायची तर कधी आवेशात यायची पण हे फक्त त्या कागदावरच उतरायचं. काही अनपेक्षित घटनांबद्दल विचारलं तर मात्र ती तंद्री मध्ये जायची. एक अतिशय उच्चभ्रू कुटुंब, घरात नेहमी नोकर-चाकरांचा राबता, वडिलांची प्रतिष्ठा म्हणजे अलौकिकच, त्यांचा शब्द म्हणजे त्या सगळ्यांसाठी 'प्रमाण'. ती जन्माला आली, तेंव्हाच त्यांनी ठरवलं की तिला पायलट करायचं. ते तिच्यासाठी वेगवेगळे मॅगझिन्स, एव्हिएशनच्या मुव्हीज, प्रोजेक्ट माॅडेल्स आणून द्यायचे... पण तिचं लक्ष फक्त पांढऱ्या कागदावर मुक्त उधळण करणाऱ्या रंगांकडे असायचं. आईला घरात फार काही बोलण्याची मुभा नव्हती, त्यामुळे जे आहे जसं आहे त्यात ती समाधानी होती.

तिच्या आईच्या बोलण्यातून एक गोष्ट मानसोपचार तज्ञांना समजली की तिची कलेची ओढ कमी व्हावी म्हणून त्यांनी तिला वेगवेगळ्या सेमिनारमध्ये एंगेज करून ठेवलं होतं... पण ती त्यातूनही पळून आली होती.मग तज्ञांनी तिची चित्रं समजून घ्यायला सुरुवात केली. ती १७ची होईपर्यंत सगळ्या चित्रांमध्ये रंग होते ...पण जसजसं वय वाढत गेलं तसतसे ते फिके होत गेले होते.

साधारण तिच्या पुढच्या तीन वर्षांच्या चित्रांमध्येे काळ्या रंगाचं प्रमाण वाढलं होतं, त्यानंतर पुढचं एक वर्ष एकही चित्र नाही , आणि नंतरची सगळी चित्रं काळी पांढरी. अशी कोणती गोष्ट होती? असं काय झालं होतं की हे रंग ओघळतीला लागले होते आणि अचानक नाहीसे झाले होते? डॉक्टरांना दाट संशय येत होता की विसाव्या वर्षी असं काहीतरी घडलं होतं ज्यानं तिच्या आयुष्यात अंधार करायला सुरुवात केली होती. डॉक्टरांनी तिला बाहेर पाठवलं आणि त्या दोघांना प्रश्न विचारायला सुरुवात केली.

असंख्य प्रश्नांची सरबत्ती करूनही बराच वेळ त्या दोघांपैकी कोणीच काही बोललं नाही आणि मग न राहवुन आईचा अचानक हुंदका फुटला. तिने बोलायला सुरुवात केली, "चित्रं, रंग हे सगळं तिच्या डोक्यात भिनत चाललं होतं, विष भिनतं तसं. तिला काहीच सुचत नव्हतं, काहीच दिसत नव्हतं. बऱ्याच ठिकाणी आम्ही तिला गुंतवण्याचा प्रयत्न केला ... पण सगळं व्यर्थ. हळूहळू यांनी तिच्यासमोर तीची चित्रं फाढायला सुरुवात केली, त्यानं ती आणखीनच बिथरली. नाईलाज म्हणून एक-दोन वेळा तिला मारहाणही केली, पण हे वेड अजिबात कमी होईना. समाजातली प्रतिष्ठा, तिला पायलट करण्याचं स्वप्न धुळीला मिळतंय की काय असं वाटू लागलं. शेवटी.....शेवटी जे नको व्हायला हवं होतं तेच घडलं, त्याच्यानंतर मात्र हा सगळा प्रकार या एका विचित्र थराला पोहोचला .... होत्याचं नव्हतं झालं. एका संध्याकाळी बरीच वादावादी झाल्यानंतर, रागात येऊन यांनी तिची काही चित्रं, कागद, रंग हे सगळं तिच्यासमोर जाळलं, ती आग बराच वेळ हातात घेऊन ती नाचत होती. आपला हात भाजतोय याचा तिला भानही राहिलं नाही. तिचं हे कलाप्रेम समजेपर्यंत आम्हाला खूप उशीर झाला होता."

हे बोलल्यावर तिची आई हमसून हमसून रडली, डॉक्टर मंडळी सुन्न झाली, काही वेळ स्मशान शांतता पसरली. त्या खोलीत आता फक्त ....तिने रेखाटलेल्या कागदांचा वाऱ्यानं होणाऱ्या फडफडीचा हलकासा आवाज येत होता.

स्वतःची स्वप्न लादण्यासाठी यांनी तिच्या स्वप्नांची होळी केली होती, तिच्या मुक्त उधळणाऱ्या रंगांची राखरांगोळी केली होती. तीनं हवेत उडावं हे स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या इंद्रधनुषी स्वप्नांना हवेत उडवून लावलं होतं. एक कायमचा अंधार तिच्या आयुष्यात निर्माण झाला होता. त्या कागदावरच्या नयनरम्य चित्रांमध्ये बागडणारी, खेळणारी, इंद्रधनु मध्ये रममाण होणारी ती ....आता करपून काळी झाली होती.

कोणाच्यातरी प्रतिष्ठेसाठी, इभ्रतीसाठी कोणाच्यातरी स्वप्नांचा बळी गेला होता. एका रंगीत आयुष्याची आहुती पडली होती आणि उरली होती ती दिशाहीन, स्वप्नहीन, अजीव अशी .......काळी पांढरी राख.

Comments